कोल्हापूर : अत्यंत भक्तीमय वातावरणात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) घरगुती गौरी गणपती विसर्जन उत्साहात पार पडले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यास मोठा प्रतिसाद मिळाला. जवळपास चार लाखांवर मूर्ती संकलन करण्यात आले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गावांसह वाड्या वस्त्यांवरही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास चांगला प्रतिसाद दिला. अनेक गावांमध्ये पारंपरिक वाद्यांसह विसर्जन मिरवणूक पार पडली.
करवीर तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद
कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून 538 टन निर्माल्याचेही संकलन झाले. करवीर तालुक्यात 61 हजार 483 मूर्ती संकलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात जलस्त्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून अविरतपणे मोहीम राबवली जात आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनासह सामादजिक संघटना तसेच मंडळांकडून चांगलाच हातभार लावला आहे. त्यामुळे या मोहिमेचा आता वटवृक्ष होत चालला आहे. प्रत्येकवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात मूर्ती संकलन काही हजारांनी वाढत असल्याने लोकांची जनजागृती होत असल्याचे द्योतक आहे.
गावांनी सुद्धा करून दाखवलं
कोल्हापूर जिल्ह्यातील गावामध्येही मूर्ती संकलनास दमदार प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषेदकडून करण्यात आलेल्या आवाहानानंतर ग्रामपंचायतींकडून चोख नियोजन करण्यात आले होते. अनेक ग्रामपंचायतींकडून मूर्त संकलनासाठी गावोगावी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. काही गावांमध्ये काहिलमध्ये विसर्जन करण्यात आले. रांगोळी विसर्जनानंतर सागवान रोप भेट देण्यात आले.
जिल्ह्यात कसा प्रतिसाद मिळाला?
जिल्ह्यात घरगुतीसह सार्वजिक मंडळांकडून पर्यावरणपूरक विसर्जनास प्रतिसाद मिळाला. यामध्ये आजरा तालुक्यात (16021), भुदरगड तालुक्यात (21596), चंदगड (14826), गडहिंग्लज (19239), गगनबावडा (3998) हातकणंगले (31885), कागल (29568), करवीर (61483), पन्हाळा (24731), राधानगरी (23437), शाहूवाडी (16488), शिरोळ (16779) मूर्तींचे संकलन करण्यात आले.
पुढील चार दिवस वाहतूक मार्गात बदल
दरम्यान, घरगुती गणेश विसर्जन पार पडल्याने कोल्हापूर शहरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहरातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरनिहाय पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कार मंडळापर्यंत नेता येणार नाही. पार्किंग आणि केएमटी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. सर्व अवजड वाहने गणेशोत्सव काळामध्ये शहरातील बाह्य रिंगरोडवरून पुढे जातील. बिनखांबी गणेश मंदिरकडून निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी प्रवेश बंद असेल. गांधी मैदानकडून खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना गांधी मैदान मेनगेट या ठिकाणी प्रवेश बंद आहे. तेथील वाहने महाराष्ट्र हायस्कूलमार्गे पुढे मार्गस्थ होतील.
इतर महत्वाच्या बातम्या