Kolhapur Football : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम आजपासून सुरु होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन मोसमात कोल्हापुरात मोसम रंगला नव्हता. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात आजपासून पुन्हा एकदा शाहू स्टेडियम गर्दीचा आणि ईर्ष्येचा रोमांच अनुभवणार आहे. आज दुपारी फुलेवाडी विरुद्ध संध्यामठ सामन्याने किक ऑफ होईल. आजपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 16 संघ रिंगणात असून 348 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील 348 खेळाडू असून देशभरातील 22 खेळाडूंचा सहभाग आहे. 24 परदेशी खेळाडू आहेत. साखळी पद्धतीने 56 सामने पार पडतील.


तब्बल मोसमाची सुरुवात लांबणीवर पडल्याने फुटबाॅल चाहत्यांना मोसमाची उत्सुकता लागली होती. मात्र, अखेर आजपासून प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त के. एस. ए. लीगचे शाहू छत्रपती के. एस. ए. लीग असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच गोल्ड कप स्पर्धा शाहू गोल्डकप नावाने ओखळली जाईल. 


दरम्यान, लीग सामन्याचे उद्‌घाटन संस्थेचे पेट्रन इन्-चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची उपस्थिती असेल. लीग सामने शांततेत पार पाडणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ३०) या चार दिवसांत आठ सामने होणार आहेत.


आज सुरु होत असलेल्या स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, बीजीएम स्पोर्टस्, बालगोपाल तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, संयुक्त जुना बुधवार पेठ, खंडोबा तालीम मंडळ-अ, कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, झुंजार क्लब, सम्राट नगर स्पोर्टस्, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, रंकाळा तालीम मंडळ या संघांचा सहभाग आहे.


इतर महत्वाच्या बातम्या