Kolhapur Crime : अश्लील हावभाव करून तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला इचलकरंजी बसस्थानकात चांगलाच चोप दिला. पीडित तरुणीच्या भावाने आणि बसस्थानकातील प्रवाशांनी टवाळखोराची धुलाई करत वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर वाहतूक पोलिसांनी निर्भया पथकाच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेची पोलिसांकडे नोंद झाली नसली, तरी टवाळखोराला सगळ्यांनी मिळून दिलेल्या चोपची मात्र चांगलीच चर्चा रंगली.


महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराची प्रवाशांनी चांगली धुलाई केल्याची घटना इचलकरंजी बस स्थानकामध्ये सोमवारी दुपारी घडली. इचलकरंजी शहर बसस्थानकात शहरातील तरुणींसह आजूबाजूच्या उपनगरातील तसेच गावांमधील तरुणींची मोठी संख्या असते.त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालय सुटताना बसस्थानकात गर्दी असते. 


प्रवाशांनी 10 मिनिटे चोपला 


पीडित महाविद्यालयीन तरुणी इचलकरंजी शहरालगतच्या एका गावामधील होती. ती नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुटल्यानंतर मैत्रिणींसह घरी जाण्यासाठी मुख्य बसस्थानकात पोहोचली. यावेळी गावी जाणाऱ्या बसच्या प्रतीक्षेत होती. बसची वाट पाहत असतानाच पीडित तरुणीकडे पाहून एक टवाळखोर हावभाव करत होता. ही बाब मुलींच्या निदर्शनास आली. तो वारंवार त्रास देऊ लागल्याने पीडित मुलीने बसस्थानकात भावाला बोलवून घेतले. भावाने बसस्थानकात पोहोचून विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तोपर्यंत हा सर्व प्रकार बसस्थानकातील अन्य प्रवाशांपर्यंत पोहोचला. प्रवाशांनी टवाळखोराला चांगलीच अद्दल घडवत सुमारे 10 मिनिटे धुलाई केली. त्यानंतर त्याला वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले.


पोलिसांनी निर्भया पथकाशी संपर्क साधला. पथकाने धाव घेत त्या टवाळखोराला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, दिलेल्या चोपची मात्र चांगली चर्चा इचलकरंजीच्या बस स्थानकामध्ये रंगली. 


अश्लील व्हिडिओ करून तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवला 


दरम्यान, इचलकरंजीमधीलच एका तरुणावर जालन्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल साईट स्नॅपचॅटवरून ओळख झाल्यानंतर अश्लील व्हिडिओ करून तरुणीच्या होणाऱ्या पतीला त्याने पाठवला होता. ही घटना जालना शहरात उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होता. हा संशयित तरुण इचलकरंजीमधील आहे. पीडित तरुणी आणि आरोपीची स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर संशयित आरोपीने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ केले होते. मैत्रिणीचे लग्न ठरल्याचे कळताच त्याने पीडिताच्या होणाऱ्या पतीला अश्लील व्हिडिओ पाठवून दिले होते. त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. 


इतर महत्वाच्या बातम्या