Kolhapur Football : कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या सौदी अरेबियाने संभाव्य विजेते म्हणून पाहल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरोधात विजय मिळवल्यानंतर जगभरातील चाहते पूर्णत: कोमात गेले होते. मात्र, फिफा वर्ल्डकप 2022 मधील 'करो या मरो'च्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने मॅक्सिकोवर विजय मिळवला. शनिवारी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-0 असा पराभव करून पुढील फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि एन्झो फर्नांडिस (Enzo Fernandez) हे दोघे अर्जेंटिनाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनीही या सामन्यात प्रत्येकी एक-एक गोल केला. अर्जेंटिनाच्या या विजयामुळं ग्रुप-सीमधील राऊंड ऑफ 16 ची शर्यत आणखी रंजक ठरली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील पराभव विसरून मेस्सीने चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. अर्थातच, त्याचे पडसाद फुटबाॅल पंढरी असलेल्या कोल्हापूरमध्येही उमटले. चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला.
संपूर्ण कोल्हापूर शहरात फुटबाॅल प्रेमींकडून बॅनर आणि कटआऊट लागली आहेत. एकमेकांच्या ईर्ष्येवर ही पोस्टर्स आणि कटआऊट लावली जात आहेत. आता यादीमध्ये मिरजकर तिकटीच्या कटआऊटची भर पडली आहे. कोल्हापूर शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मिरजकर तिकटीला मेस्सी प्रेमींनी भव्य असे कटआऊट लावले आहे. बाजूला तुलनेत लहान कटआऊट नेमारचे लावण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे. दुसरीकडे बिंदू चौकातही मेस्सी, नेमार, रोनाल्डो आणि सुनील छेत्रीचे कटआऊट आणि बॅनर चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे. त्यामुळे आता आपल्या स्थानिक खेळाडूंना आणि संघाना पोत्साहान देण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत.
चार डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी (kolhapur Football) संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गर्दी अन् जोश अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाहू स्टेडियमवरही जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी 16 संघांची तयारी सुरु आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. सॉकर
इतर महत्वाच्या बातम्या