Kolhapur Football :  फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूटचे (साई) अध्यक्ष सतीश सूर्यवंशी म्हणाले, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा फुटबॉल भूषण सन्मान सुरू करण्याचा उद्देश आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू या सर्वांसाठी पात्र असतील. जिल्ह्याबाहेरील एकाच खेळाडूला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. तज्ज्ञ समितीकडून फुटबॉल भूषण सन्मानासाठी निवड होईल. 


सर्वोत्तम संघ, शिस्तबद्ध संघ, प्लेयर ऑफ द इयर, उदयोन्मुख खेळाडू, सर्वोत्तम फॉरवर्ड, सर्वोत्तम हाफ, सर्वोत्तम डिफेन्स, सर्वोत्तम गोलकीपर, सर्वोत्तम जिल्ह्याबाहेर खेळाडू, सर्वोत्तम प्रशिक्षक, सर्वोत्तम संघ व्यवस्थापक, सर्वोत्तम स्पर्धा संयोजक, सर्वोत्तम क्रीडा वार्तांकन, सर्वोत्तम क्रीडा छायाचित्रकार, सर्वोत्तम क्रीडा वार्तांकन, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वोत्तम पंच ,सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ समर्थक अशा विभागात पुरस्कार दिले जाणार आहेत. फुटबॉल भूषण जीवन गौरव पुरस्कारही घोषित केला जाणार आहे. फुटबॉल भूषण मानांकन साठी निवड समितीने नियमावली केली आहे. 2022 आणि 2023 या वर्षातील केएसए लीग व सीनियर संघाचा सर्व स्पर्धातील सहभाग नोंदणीकृत खेळाडूला पुरस्कार देण्यात येणार आहे.


सामन्यांमध्ये तसेच ड्रेसिंग रूममधील खेळाडूचे वर्तन, सर्व स्पर्धेतील सामन्यामधील येलो कार्ड, रेड कार्ड यावरून मायनस पॉईंटही केले जाणार आहेत. हंगाम संपल्यानंतर फुटबॉल भूषण पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. ही घोषणा ऑगस्ट महिन्यामध्ये एका कार्यक्रमात केली जाणार असून त्याच ठिकाणी खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले जातील. 


कोल्हापूर फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे. अनेक तालीम, मंडळे आणि गल्लीबोळांमध्ये फुटबाॅलपटूंची कटआऊट आणि बॅनर्स लावण्यासाठी ईर्ष्या लागली आहे. त्यामुळे आता आपल्या स्थानिक खेळाडूंना आणि संघाना पोत्साहान देण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. 


चार डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी (kolhapur Football) संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गर्दी अन् जोश अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाहू स्टेडियमवरही जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी 16 संघांची तयारी सुरु आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या