Kolhapur Rain: कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला सलग दोन दिवस वळीव पावसाने झोडपून काढले. वळीव पावसाने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे, तसेच उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नद्यांची पात्र कोरडी पडल्याने ऊसावर विपरित परिणाम झाला होता. या पावसाने ऊसासह अन्य उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.वीजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. वीजेचे खांबही मोडून पडले आहेत. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सर्वदूर वळीव पावसाने झोडपले
कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सहानंतर जोरदार वळीव पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागाकडून वळीव पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सुमारे तासभर झालेल्या पावसाने पादचाऱ्यांसह सर्वांचीच दैना झाली. वादळी वाऱ्यामुळे करवीर तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या, तर काही ठिकाणी पूर्णत: झाडे मोडून वीजेच्या तारांवर पडल्याने अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
चंदगड शहरासह तालुक्यात दुसऱ्या दिवशी सलग वळीव पावसाने हजेरी लावली. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहीमपूर, गवसे, पुंद्रा, कानूर, कोकरे, अडुरे परिसरातही पाऊस झाला. शिरोळ तालुक्यातही वळीव पावसाने हजेरी लावली. शहरास तालुक्यातील शिरोळ, घालवाड, कुटवाड, कनवाड शिरटीमध्ये पाऊस झाला. गडहिंग्लज शहरासह तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील अन्य गावांना पावसाने झोडपून काढले. कागल तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मुरगूडमध्येही चांगलाच बरसला. पावसाने आठवडी बाजाराला फटका बसला. बाजार करुन परतणाऱ्यांची व व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गगनबावडा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
इतर महत्वाच्या बातम्या