Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी पुन्हा दडपशाहीचा कळस केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधील महामेळावा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज कोगनोळी टोलनाक्यावरून बेळगावला निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी दडपशाही करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोगनोळी टोलनाक्याव रोखले. 


माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी रोखल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी कर्नाटक सरकारची दडपशाही दिसून आली. हसन मुश्रीफ यांच्यावर थेट काठी उगारण्यापर्यंत कर्नाटक पोलिसांची मजल गेली. पोलिसांनी थेट हसन मुश्रीफांवर काठी उगारल्याने संतापाचा कडेलोट झाला.


यावेळी हसन मुश्रीफ यांनी बोलताना हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता न आल्याने खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, माझ्या नजरेखाली असलेल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असताना मी अधिवेशनाला कसा जाऊ शकतो? आम्ही सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी महामेळाव्याला बेळगावमध्ये जात होतो. मात्र, मेळाव्याची परवानगी नाकारणे, मंडप काढून फेकणे, स्पीकर फेकणे ही निषेधार्ह गोष्ट आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. गेल्या 62 वर्षांपासून सीमाभागावर अन्याय होत असल्याने हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. माझ्या कागलला हा भाग जोडून आहे. त्यामुळे आम्ही बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता. 


बेळगावमध्ये कलम 144 लागू 


दरम्यान, बेळगावमध्ये (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला होता. 


कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले होते. त्याची जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक पोलिसांनी अचानक मेळाव्याला परवानगी नाकारत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या