Kolhapur District Gram Panchayat Election : अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील (Kolhapur South) सर्वांत मोठ्या गावांपैकी एक असलेल्या कळंबा (Kalamba Sarpanch) गावचा सरपंच बिनविरोध करण्यात सतेज पाटील (Satej Patil) गटाला यश आलं आहे. थेट सरपंचपदासाठी दाखल झालेल्या चारपैकी तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने लोकनियुक्त सरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाच्या सुमन विश्वास गुरव यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने सुद्धा खाते खोलले आहे. यापूर्वी शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी गावात भाजपचा सरपंच बिनविरोध झाला आहे. 


गटामध्येच कुस्ती न लावता निवडणूक बिनविरोध


कळंब्यात थेट सरपंचपदासाठी मागासवर्गीय महिला आरक्षण होते. या गटातून सतेज पाटील गटाकडून माजी सरपंच वनिता भोगम, अश्विनी जाधव, सुमन गुरव, वैशाली दिलीप टिपूगडे या इच्छुक होत्या. टिपूगडे व जाधव यांनी सतेज पाटील यांच्या सुचनेनुसार तत्काळ माघार घेतली. दुसरीकडे विनिता भोगम, सुमन गुरव निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. सतेज पाटील यांनी चर्चा केल्यानंतर विनिता भोगम यांनी अर्ज माघार घेतल्याने सुमन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. कळंब्यात महाडिक गटाला उमेदवार मिळाला नाही. पाटील गटाकडून मात्र चार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करत गटामध्येच कुस्ती न लावता निवडणूक बिनविरोध केली आहे. 


आजपासून निवडणुकीत रंग भरणार


दरम्यान, अर्ज माघारीसाठी आज दुपारी तीनपर्यंत मुदत होती. दुसरीकडे निवडणुक रिंगणातील वैध उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे 474 गावांमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगत येणार आहे. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने महिला वर्गही प्रचारात दिसेल, यात शंका नाही. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी तसेच सदस्यपदासाठी टोकाच्या ईर्ष्येने अर्ज दाखल झाले आहेत.


पन्हाळा तालुक्यात तीन ग्रामपंचायती बिनविरोध 


दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील (Panhala Tehsil) 50 तालुक्यातील 260 जणांकडून थेट सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी छाननीनंतर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर दोन ठिकाणी सदस्य बिनविरोध झाले आहेत, सरपंचपदासाठी निवडणूक होईल. मानवाड, आसगाव व गालीवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. कोतोलीपैकी माळवाडी व मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले, पण थेट सरपंचपदासाठी निवडणूक होईल.  


 इतर महत्वाच्या बातम्या