Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, दोघांकडून तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्याचे समोर आले आहे. दोघांना 15 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. संतोष शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये दोघांनी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी छळल्याचे नमूद केले होते. तसेच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्यामुळे संतोष यांनी पत्नी आणि मुलासह विष प्राशन करून गळा चिरून आत्महत्या केली होती.
एपीआय राहुल राऊतकडून मोबाईल फाॅरमॅट, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि राहुल राऊत फरार झाले होते. त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या टीमने सोलापुरातून ताब्यात घेत अटक केली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गडहिंग्लजमधून फरार झाल्यानंतर राहुल राऊतने जुने दोन मोबाईल फाॅरमॅट करत नवा मोबाईल सोलापुरात खरेदी केला होता. तसेच त्याने तो मोबाईल आशिष नावाच्या व्यक्तीकडे दिला होता. मोबाईल फाॅरमॅट केल्याने डाटा रिकव्हर करण्यासाठी राऊतचे मोबाईल फाॅरेन्सिकसाठी दिले जाणार आहेत. दुसरीकडे, संतोष शिंदे यांच्याही मोबाईलमध्ये चार अननोन नंबर आढळले होते. यामधील दोन व्हॉट्सअॅपचे कॉल आहेत. संशयितांनी हे नंबर वापरले आहेत का? याचाही पोलीस तपास करत आहेत. आरोपी राहुल राऊतने मोबाईलमधून कोणतीही माहिती मिळू नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
अंगावर वर्दी येताच उचापतीच सर्वाधिक!
राहुल हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील निलजीमधील आहे. वडिलांनी अधिकारी होण्यासाठी त्याला प्रोत्साहान दिले होते. मात्र, अंगावर वर्दी येताच उचापती आणि भानगडीच सर्वाधिक केल्या आहेत. त्याच्या वर्तनाने नातेवाईकांना सुद्धा धक्का बसला आहे. गडहिंग्लजमध्ये त्याला बेड्या पडल्या असल्या तरी यापूर्वी त्याच्याविरोधात यवतमाळ, मारेगाव, राजापेठ, कोतवाली, मुंबईत तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काम कमी आणि उचापतीच सर्वाधिक अशी स्थिती आहे. कोतवालीमध्ये त्याच्याविरोधात झालेल्या तक्रारीनंतर अमरावती कंट्रोल रुमला बदली करण्यात आली होती. सध्या त्याला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर बडतर्फीची सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे
दरम्यान, शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका शुभदा पाटील, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या