कोल्हापूर : मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घटना घडली. काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. भुदरगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 


मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ


मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. मात्र सासरच्या लोकांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी टाकली. याप्रकरणी पती अवधूत सलते याच्यासह चौघांना अटक केली आहे.


मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा


दरम्यान, कोल्हापुरात 15 वर्षांचा मुलगा स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे भासवून घरात दरबार थाटणाऱ्या पालकांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार कसबा बावडा येथील कदमवाडी रोडवरील राम चौगुले कॉलनीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता. मुलाचे पालक इंद्रायणी हितेश वलादे (वय 36) आणि हितेश लक्ष्मण वलादे (वय 37, दोघेही सध्या रा. कदमवाडी रोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे गडचिरोली येथील वलादे दाम्पत्य किरण पालकर यांच्या घरी भाड्याने राहते. आपला 15 वर्षीय मुलगा स्वामींचा अवतार असून, त्याच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे ते लोकांना सांगत होते. कुलदैवताची पूजा करा, स्वामींच्या नावाने प्रसाद करा आणि पाच गुरुवार दर्शनासाठी या, असे ते लोकांना सांगत होते. यातून त्यांनी घरातच दरबार थाटला होता. श्री बालस्वामी समर्थ भक्त मंडळाचीही स्थापना केली होती. वलादेंचा मुलगा 15 वर्षांचा असला तरी त्याच्या शरीराची योग्य वाढ झालेली नाही. तो आठ ते दहा वर्षांचा असल्याचा दिसतो. त्यामुळे शारीरिक व्यंगाचा गैरवापर करून दरबार सुरु केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या