Kolhapur Crime : विहिरीतून पाणी काढत असताना शेजारीच बांधलेल्या म्हशीचा अचानक धक्का लागल्याने आजीसमोर नातीचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यात घडली. अवघ्या 14 वर्षीय अशाप्रकारे अंत झाल्याने आजीच्या विहिरीवर हंबरडा फोडला. कार्तिकीच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आजरा शहरातील भारत नगरमधील कार्तिकी सचिन सुतार (वय 14) या शालेय विद्यार्थिनीचा माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (12 मार्च) चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली आहे. 


नेमका प्रसंग काय घडला?


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकी आजीसह शेतातील विहिरीतील पाणी काढून म्हैस धुवत होती. सोबत असलेली आजी बाजूला शेतात शेळ्या चारत होती. यावेळी शेजारीच असलेल्या झाडाला बांधलेली म्हैस अचानक फिरल्याने कार्तिकी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोर झाली. नात पडताच आजीने आरडाओरड सुरु केला, पण शेतामध्ये कोणीच नव्हते. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून आजरा पोलिसांना माहिती दिली. 


वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत


दरम्यान, आजरा तालुक्यात चिमणेत शेतातील आग विझवताना पाय घसरुन पडल्याने वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (8 मार्च) घडली होती. विठोबा भिमराव नादवडेकर (वय 83 वर्षे) असं वृद्धाचं नाव आहे. शेतामध्ये पाला एकत्र करून जाळण्यासाठी विठोबा नादवडेकर शेतात बुधवारी (8 मार्च) गेले होते. पाला गोळा करुन झाल्यानंतर त्यांनी तो पेटवून दिला. मात्र, रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे पाला पेटवल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. भेदरलरेल्या नादवडेकर आग इतरत्र पसरेल म्हणून आग विझवण्यासाठी धडपड करु लागले. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग असल्याने त्यांची आग विझवताना ते पाय घसरुन पडले. पडल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या