Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत दोघेही गडहिंग्लजमधून फरार झाले होते.
शुभदा पाटील आणि राहुल राऊतने संतोष शिंदे यांना एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देतानाच त्यांचा मुलगा अर्जुनशी सुद्धा गैरवर्तणूक केली होती. या दोघांसह पुण्यातील दोन तरुणांचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख करताना संतोष शिंदे यांनी या चौघांना आत्महत्येला दोषी धरावे, असे नमूद केले होते.
दोघांनाही कोल्हापूर पोलिसांनी सोलापुरातून उचलले
सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या शुभदा आणि राहुलला कोल्हापूर पोलिसांच्या टीमने सोलापुरातून रविवारी संध्याकाळी ताब्यात घेतलं होते. ते सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनी संतोष शिंदे यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. या दोघांनाही कोल्हापूर पोलिसांनी अटक करुन आज कोर्टात हजर केले. मात्र, याच प्रकरणातील आणखी दोघांचा शोध कोल्हापूर पोलीस करत आहेत. पुण्यामधील विशाल बाणेकर आणि संतोष पाटे यांची नावेही सुसाईड नोटमध्ये आहेत. पुण्यातील दोघांची नावे आर्थिक व्यवहारातून लिहिली आहेत. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता?
दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी संतोष शिंदे यांच्या घरी रविवारी (25 जून) भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा शिंदे, बहीण प्रतिभा मांडेकर आणि नातलगांनी हंबरडा फोडला. संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी माझ्या नातवाचा दोष तरी काय? असे म्हणत आक्रोश केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झाले. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी हंबरडा फोडला. त्या रडतच सांगत होत्या, "माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेलं आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता," असे म्हणताच मुश्रीफ यांनाही अश्रूो अनावर झाले.
इतर महत्वाच्या बातम्या