हातकणंगले (जि. कोल्हापूर) : ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ठेवल्यानंतर मालकीणीकडेच वाईट नजरेनं पाहू लागल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकले. मात्र, त्याने त्याच रागातून मालकिणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले तालुक्यातील (Hatkanangale) घुणकी या गावामध्ये घडला. सुषमा अशोक सनदे ( वय 45) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुनील गणपती जाधव (रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.. सुषमा या गुरुवार सकाळपासून बेपत्ता होत्या. घुणकीमधील डाग रस्त्याजवळील ऊसाच्या शेतात सुषमा यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याचबरोबर तो सराईत गुन्हेगार सुद्धा आहे. पुण्यामध्ये त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले. सुषमा गुरुवारी गुरांना घेऊन चालण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे त्या दिवसभरात परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला. मात्र, त्यांचा ऊसाच्या फडामध्ये मृतदेह आढळून आला.
सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता
त्यानंतर सुषमा यांचे पती अशोक सनदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. यावेळी संशयित म्हणून सुनीलविरोधात फिर्याद दिली. सनदे यांच्या ट्रॅक्टरवर दोन वर्षांपूर्वी सुनील हा ड्रायव्हर होता आणि त्यामुळे तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून तोच राग त्याच्या मनामध्ये होता. याच रागातून त्याने हा खून केला.
पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पोलिसांनी संशयिताचे नाव समोर आल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन नाशिकमध्ये दिसून आले. त्यानंतर तो काही वेळातच पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक पाठवून अटक करण्यात आली. सुषमा यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, असा परिवार आहे.
बेरोजगार इंजिनिअरने कॉलनीतील म्हातारीच्या डोक्यात घातला दगड
दरम्यान, पाच दिवसांपूर्वी कोल्हापुरात (Kolhapur Crime) दारु गांजाच्या आहारी गेलेल्या बेरोजगार सिव्हील इंजिनिअरने काॅलनीमधील वृद्ध महिलेनं दारु पिताना दुसऱ्यांदा पाहिल्याने तिचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 70) यांचा निर्घृण खून झाला होता. पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले (वय 24, रा. रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली आहे. याच प्रतीकने सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे एका नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या कारनाम्याने कुटुंबावर प्रचंड मानसिक आघात झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या