कोल्हापूर : शरीरसंबंधास विरोध केल्याने नराधमाने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यातील भादवणमध्ये घटली. आशाताई मारुती खुळे (वय 43) असे या दुर्दैवी महिलेचं नाव असून पुरावा नष्ट करण्यासाठी ऊसाच्या फडाला आग लावण्यात आली. नराधम आरोपी गावामधील असून योगेश पांडुरंग पाटील (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेशने ऊसाच्या फडात फरफटत नेत गळा दाबून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी फडाला आग लावली.
योगेश हा गावात ट्रक्टर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मयत आशाताई आईसह माहेरी भादवणला राहत होत्या. एका गरीब महिलेचा खून झाल्याबद्दल गावात संताप व्यक्त करण्यात आला.
ऊसाच्या फडात नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशाताई गुरुवारी दुपारी घरातील कचरा टाकण्यासाठी भादवण-भादवणवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याकडे गेल्या होत्या. नराधम योगेश पाटील त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याने त्या येताच योगेशने त्यांना ऊसात फडात ३० फूट अंतरावर फरफटत नेले. ऊसात नेल्यानंतर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आशाताई यांनी आरडओरडा केला. यावेळी योगेशने त्यांचे तोंड दाबून साडीने गळा आवळून खून केला.
खून करून पळून गेला
आशाताईंचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने ऊसाच्या फडातून पळ काढून घरात निघून गेला. त्यानंतर पुन्हा तो त्या परिसरात ये जा करत होता. यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सायंकाळी उसाच्या फडाला आग लावून दिली आणि पुन्हा घरात येऊन थांबला. ऊसाची आग गावकऱ्यांनी आटोक्यात आणल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेला आशाताई यांचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
सीसीटीव्हीमुळे नराधम सापडला
आगीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. यावेळी योगेश तेथून चार-पाच वेळा फेऱ्या मारताना कैद झाला होता. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर खून केल्याची कबुली दिली.
महिलेचा दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आयुष्याचा शेवट
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घडली होती. काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. भुदरगड पोलिसांत पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. मात्र सासरच्या लोकांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांचा छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी टाकली.
इतर महत्वाच्या बातम्या