Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कोल्हापूर दौरा (Kolhapur Visit) रद्द झाला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही माहिती दिली. फडणवीस यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते. 


जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याची चर्चा 


दरम्यान वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. नव्या सर्वेक्षणामुळे शिवसेनेने भाजपला डिवचल्याचा टोला विरोधकांनी लगावला. परिणामी यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कोल्हापूरला येण्याचं टाळल्याची चर्चा रंगली आहे. 


दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण


या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानाचा त्रास होत आहे. सायनसचा त्रास बळावल्याने देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस आज कोल्हापूरला जाणार नाहीत, अशी माहिती दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना दिली. त्यांच्याऐवजी आता चंद्रकांत पाटील कोल्हापूरला रवाना होणार आहेत. 


शिवसेनेची जाहिरात आणि चर्चांना उधाण


आतापर्यंत राज्याच्या राजकारणात 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.


संबंधित बातमी


'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख