कोल्हापूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटेच जाऊन तिचा वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) इचलकरंजीत (Ichalkaranji) घडली. संबंधित प्रेयसीने आरडाओरडा आणि झटापट केल्याने प्रियकराने वायर टाकून पळ काढला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दिलीप राजेंद्र पागडे (वय 34, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली.
नेमका प्रकार काय घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता व संशयित आरोपी दिलीप पागडे एकमेकांना गेल्या चार वर्षांपासून ओळखतात. या ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद झाल्याने पीडित महिलेनं दिलीपसोबत संबंध तोडून टाकले होते. तसेच त्याच्याशी कोणताही सबंध नसल्याचे पीडित महिलेनं स्टँप पेपरवर लिहूनही घेतले होते.
दिलीपकडून संबंध जुळवण्याचा प्रयत्न
संबंध तोडून टाकल्यानंतर पीडित महिलेशी पुन्हा संबंध जुळवण्यासाठी दिलीपचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे याच प्रयत्नातून दिलीप वारंवार त्या महिलेला कामावर येता-जाता पाठलाग करत होता. दिलीपने बुधवारी सकाळी (4 ऑक्टोबर) रोजी पहाटे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला घरासमोर अंगणात गाठले. यावेळी त्या महिलेच्या पाठीमागून येत घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून ठार मारण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने पीडिताचा गळा आवळला. यावेळी त्या महिलेने आरडाओरडा करत दिलीपला बाजूला ढकलून देत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यामुळे संशयित आरोपी दिलीप गळ्यातील वायर तिथेच टाकून फरार जाला. पीडिताने फिर्याद दिल्यानंतर शहापूर पोलिसांनी दिलीप पागडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्टेट्स ठेवला कुत्र्याचा, जाब विचारायला गेली तरुणी अन् झाली मारामारी
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील मानेवाडीत कुत्र्याचा स्टेट्स ठेवल्याने मारामारी झाल्याचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे मारामारी करणारे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी तरुणीने फिर्याद दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यात नंदकुमार शिवाजी जाधव, पृथ्वीराज नंदकुमार जाधव व अभिषेक आनंदा जाधव (तिघेही रा.कोतोलीपैकी मानेवाडी, ता.पन्हाळा) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाईलवरील कुत्र्याच्या स्टेटस्वरून फिर्यादी आणि संशियतांमध्ये गैरसमज निर्माण झाला. यानंतर संशयितांनी फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. या मारहाणीनंतर जाब विचारायला गेलेल्या फिर्यादी तरुणीला तिच्या भावाला व आईला संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
इतर महत्वाच्या बातम्या