कोल्हापूर : बनावट सोनं खरं भासवून बँकेला गंडा घालणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीने बनावट सोनं गहाण ठेवून 60 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार सुद्धा संशयित आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 22 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसानी या प्रकरणात सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 


बँकेच्या वार्षिक तपासणीत फसवणुकीची घटना समोर


युनियन बँक ऑफ इंडियाची बनावट सोनं गहाण ठेवून 60 लाखांची फसवणूक झाल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक दीपक कुमार साह यांनी पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार सागर कलघटगी याचाही संशयित आरोपीमध्ये समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. 22 जणांनी मूल्यांकनकाराकडून बनावट सोनं खरं असल्याचं भासवून 60 लाखांची फसवणूक केल्याचे उघड झालं आहे. ही फसवणूक मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आली आहे. बनावट सोनं गहाण ठेवून फसवणूक केल्याची तक्रार बँकेच्या वार्षिक तपासणीत  समोर आले. 


जादा परताव्याचे आमिष, 1 कोटी 37 लाखांचा गंडा


दरम्यान, कोल्हापुरातील शाहूपुरीमधील पाच बंगला परिसरातील प्रियांश कन्सलटन्सी कंपनीने गुंतवणुकीवर पाच ते 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. संग्राम शिवाजी पाटील (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कंपनीचे प्रमुख प्रमोद आनंदा कांबळे आणि प्रवीण आनंदा कांबळे या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. 


फिर्यादी पाटील यांच्यासह शेकडो गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2020 पासून कंपनीत पैसे भरले होते. सुरुवातीचे काही महिने परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे थांबले. गुंतवणूकदारांनी वारंवार कंपनीच्या प्रमुखांकडे पाठपुरावा करूनही परतावे मिळाले नाहीत, तसेच मुद्दलही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन कंपनीच्या विरोधात फिर्याद दिली. भावाचा शोध सुरू आहे. अटकेतील संशयिताच्या चौकशीतून फसवणुकीची व्याप्ती समोर येईल, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या