Kolhapur: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईतील या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यातील गावांचा शहरांमध्ये समावेश करण्यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो. मात्र, याला 20 गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या 20 गावांमध्ये बंद पाळला जात आहे. 20 गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गावातील नागरिकांनी केलाय. कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीसाठी 6 वेळा प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत, परंतु राजकीय विरोधामुळे ते अद्याप मंजूर झालेले नाहीत. मात्र, आज याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
दुसरीकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांना हद्दवाढ नको आहे केवळ कृती समितीला ही हद्दवाढ हवी आहे. यामध्ये आर्थिक गणिते असल्याचा आरोप देखील हद्दवाढीला विरोध असणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे.कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही. असं असताना आम्हाला यामध्ये समाविष्ट का करून घेता, ग्रामपंचायतींना आता थेट निधी मिळत आहेत त्यामुळे आमचा विकास आम्ही करतो अशी भूमिका हद्दवाढ विरोधी गावकऱ्यांनी घेतली आहे.
ग्रामस्थांचा आक्षेप नेमका कशाला?
गावकऱ्यांचा आरोप आहे की, महानगरपालिका आधीच शहरातील नागरिकांना पुरेशा सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत गावांचा समावेश करून आम्हाला का अडचणीत टाकले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतींना आता थेट निधी मिळतो आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फतच आम्ही विकास साधतो, असे ग्रामस्थ म्हणाले. हद्दवाढ ही केवळ कृती समितीच्या आर्थिक फायद्याचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रस्तावातील गावांची यादी
प्रस्तावात कळंबे तर्फ ठाणे, पाचगाव, शिरोली, नागांव, वळिवडे-गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेवावाडी, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी यांचा समावेश आहे. सध्या कोल्हापूर शहराचे क्षेत्र 66.82 चौ.किमी असून, प्रस्तावित गावांसह ते 189.24 चौ.किमी होणार आहे. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे 9 लाख आहे. 1946 पासून शहराची हद्द वाढलेली नाही, हे विशेष.
हेही वाचा: