Sudhakar Badgujar in BJP: नाशिकमधील नाट्यमय राजकीय घडामोडींवर आज अखेर पडदा पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर आज सुधाकर बडगुजर अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला होता. पण स्थानिक नेत्यांच्या विरोधाला झुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. तर मी शिवसेनेत 18 वर्ष काम केलं, माझा अनादर केला...माझी काय चूक? असा सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला आहे.

सुधाकर बडगुजर नेमकं काय म्हणाले?

2017 ते 2022 हा पाच वर्षांचा कालावधी सोडला तर आता प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीत जी कामे होत आहेत, ती प्रशासनामुळे सुरू आहेत. कामे होत असताना प्रशासनावरती लोकप्रतिनीधींचा अंकूश असला पाहिजे. निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणपकीमध्ये भाजपला मोठं यश मिळावं यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ज्या पक्षामध्ये आदरातिथ्य मिळतं त्या पक्षामध्ये जाणं कधीही उचित आहे. ज्या पक्षामध्ये मी 18 वर्षे काम केलं त्यांनी माझा अनादर केला. मला पक्षातून हाकलण्याची भूमिका त्यांनी घेतली. माझी काय चूक होती तेही मला कळलेलं नाही, असंही पुढे सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर हे आज आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत दुपारी एक वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये बडगुजर यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे बडगुजर यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला होता मात्र स्थानिक आमदारांचा विरोध करून भाजपने बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिला आहे माजी मंत्री पवन घोलप यांच्यासह अन्य काही कार्यकर्ते आणि समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळी बडगुजर मोठे शक्ती प्रदर्शन देखील करणार असल्याची माहिती आहे.

पक्षप्रवेशावर बानवकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे. त्याबद्दल माझ्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही मुंबईत गेल्यानंतर चर्चा झाली तर हा विषय पुढे जाईल मात्र आतापर्यंत या संदर्भात माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. तर यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना बडगुजर म्हणाले, बावनकुळे यांच्या बाबतीत त्यांनी बोलण्यास नकार दिला, पुढे ते बोलले मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल, सर्व ठरले आहे त्याशिवाय जातोय का? असंही त्यांनी पुढे म्हटलंय.