Kolhapur Municipal Corporation : गुडघाभर खड्ड्यांनी आणि भररस्त्यात दोन-दोन फुटांवर आलेल्या चॅनेलच्या झाकणांनी कोल्हापुरातील रस्त्यांची ख्याती महापालिकेनं सर्वदूर पोहोचवली आहे. त्यामुळे खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरच्या रस्त्यांनी राज्यभर नाचक्की होत असल्याने प्रशासकीय पातळीवरून पहिल्यांदाच तगडा झटका देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या अत्यंत सुमार दर्जानंतरही पदावरून चिकटून बसलेल्या कोल्हापूर मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पदभार काढून घेत आता जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. 


कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था कशा पद्धतीने झाली आहे, याचा पाठपुरावा एबीपी माझाने सतत केला आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तातडीने कार्यभार काढून घेण्यात आला आहे.  नुकतेच कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे आले होते. त्यांनीही रस्त्यांची दुरावस्था पाहिली होती. त्यानंतर तातडीने प्रधान सचिव यांना फोन करून सरनोबत यांच्या जागी दुसरा माणूस नेमावा अशा सूचना केल्या होत्या. कोल्हापूर शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. मात्र, असं असून देखील सरनोबत यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होते.त्यामुळे उचलबांगडी करून त्यांच्या जागी हर्षजीत घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


नेत्रदीप सरनोबतांविरोधात सातत्याने तक्रारी 


रस्त्यांची पार वाताहत झाल्याने सातत्याने नेत्रदीप सरनोबत यांच्या कामावरून कोल्हापुरातील राजकीय नेत्यांसह सामाजिक संघटनांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. मनपा प्रशासकांकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मोठी कारवाई त्यांच्यावर झाली नव्हती. मनपाच्या कारभारावून टीकेचे आसूड ओढले जात आहेत. मात्र, कोणत्याच अधिकाऱ्यांवर थेटपणे कारवाई झाली नव्हती. यावेळी पहिल्यांदा कारवाई झाली आहे. 


फेब्रुवारी महिन्यातही एबीपी माझाने उठवला होता आवाज 


3 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या तीन जीवघेण्या स्पीड ब्रेकरवर तब्बल वर्षभर सांगून झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेकडून पांढरे पट्टे मारण्यात आल्यानंतर अवघ्या 12 तासांत गायब झाले होते. यानंतर एबीपी माझाने महापालिकेच्या कारभारावरून दणका दिल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये सातारहून मशिन आणून त्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात आले होते. 'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी! याची प्रचिती समस्त कोल्हापूरकरांना त्यावेळी आली होती. 


या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा विनंती करण्यात आली होती. वर्षभरापासून विनंती केल्यानंतर त्यांनी  कामाला मुहूर्त मिळाला. मात्र, केलेलं काम दिवस सोडा, अवघे 12 तासही राहिलं नव्हते. नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा माध्यम प्रतिनिधींनी अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी सातत्याने विनंती केली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली होती.  एबीपी माझाने यापूर्वी कोल्हापुरातील नागरी समस्या, तसेच रस्त्यांच्या दुर्दशेवरून सातत्याने आवाज उठवत झोपी गेलेल्या महापालिकेला जागं करण्याचं काम केलं आहे. कोल्हापुरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर माझाने सातत्याने यासंदर्भात आवाज उठवला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या