Kolhapur News : कोल्हापूर शहरात काल (30 मार्च) 'मोदी हटाव, देश बचाव' या आशयाचे बॅनर्स महत्वाच्या चौकाचौकात लागल्याचे समोर आले होते. हे बॅनर्स महाराष्ट्रात आम आदमी पक्षाकडून लावण्यात आले आहेत. यानंतर आता कोल्हापूर भाजपने आक्रमक  भूमिका घेत बॅनर लावणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे. अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांचा बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. तसेच यापुढेही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अशीच राहिल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. 


पीएम मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर विचारांची विकृती असणारे आंदोलन सुरु केले आहे, याचाच भाग म्हणून कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले. तसेच पत्रकार परिषद घेऊन 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली असल्याचे भाजपने म्हटले आहे.  या घटनेचा तीव्र निषेध म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वात भाजपच्या शिष्ठमंडळाने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. निवेदनातून संबंधित आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


राहूल चिकोडे यांनी सांगितले की,  शहरभरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी बॅनरबाजी झाली याची जबाबदारी आम आदमी पक्षाने स्वीकारली आहे. एखादी अतिरेकी संघटना ज्याप्रमाणे आपल्या कृत्याची कबुली देते अशीच पद्धत या संघटनेची आहे. अशा कुरापती करायला या संघटनांना पैसा कुठून येतो? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर अशा संघटनांना बळ कुठून मिळते? देशाबाहेरील विघातक शक्तींचा यामागे हात आहे का ? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. 


यावेळी सरचिटणीस दिलीप मैत्राणी, हेंमत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, संतोष भिवटे, नाना कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, रवींद्र मुतगी, रमेश दिवेकर, आशिष कपडेकर, विजय खाडे, गायत्री राऊत, निप्पणीकर, हर्षद कुंभोजकर, सुनील पाटील, सौरभ मालंडकर, पारस पलीचा, विजय दरवान, ओंकार गोसावी, प्रसाद मुजुमदार, रोहित कारंडे, सुनील पाटील, अमेय भालकर,विवेक वोरा, ह्रशंक हरळीकर यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या