Kolhapur Bajar Samiti Election : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून जनसुराज्य, शिंदे गट पुरस्कृत आघाडीच्या मदतीने 16 जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या 18 पैकी 16 जागांवर सुमारे 4 हजारांहून अधिक मतांनी महाविकास आघाडी विजयी झाली आहे. विरोधी शिवशाहू परिवर्तन आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 


कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 16 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात विजय झाल्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.


एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे 14 हजार 133, ग्रामपंचायतीतील 5 हजार 733, अडते व्यापारी गटाचे मतदान 1217, माथाडी तोलाई गटाचे 894 मतदान आहे. यापैकी एकूण 20 हजार 280 मतदान झाले होते. 


स्वाभिमानी मतदाराकडून मतपेटीतून पैसे परत


कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात आहे तसेच घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मिळालेले हजार रुपये तसेच मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या. 


जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजच निकाल 


जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात जागा बिनविरोध झाला असून उर्वरित 11जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यासाठी मतदान होत आहे. सेवा संस्था आणि ग्रामपंचायत या दोन गटातील 2 हजार पाचशे सभासद मतदार आहेत. चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी पाचनंतर मतमोजणी करू निकाल जाहीर केला जाईल. दुसरीकडे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Raju Shetti : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मिशीला खरकटे लागल्याने बदल्यांवरुन मूग गिळून गप्प आहेत का? सर्व विभागाच्या बदल्या ॲानलाईन करा; राजू शेट्टींची मागणी