Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनासाठी जमीन मालकांना संमतीपत्रे सादर करण्यास कोल्हापूर महसूल प्रशासनाने सांगितले आहे. भूसंपादनासाठी चर्चेच्या तीन फेऱ्या होऊनही कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुडशिंगी गावातील जमीन मालक आणि प्रशासन यांच्यात अद्यापही दराबाबत तोडगा निघालेला नाही.


धावपट्टी विस्तारासाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रशासनाला 25 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. आतापर्यंत 113 मालकांच्या केवळ 5 हेक्टर जमिनीसाठी प्रशासनाला संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत.


उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी म्हटले आहे की, जमीन मालकांनी आम्हाला त्यांची जमीन संपादित करण्यासाठी त्यांना अपेक्षित असलेली रक्कम लिहिली पाहिजे. त्यांना संमतीपत्रेही द्यावी लागतील. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, भूसंपादन कायदा, 2013 नुसार संपादन केले जाऊ शकते आणि मालकांना वाटाघाटीतून मिळण्याच्या अपेक्षेपेक्षा 25 टक्के कमी मोबदला मिळू शकेल. एकदा बोलणी झाली, की लवकरात लवकर जमीन संपादन करणे सोपे होते.  विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काळाची गरज आहे.


जमीन मालकांनी 16 सप्टेंबरपर्यंत संमतीपत्र आणि किंमत मागणी पत्र प्रशासनाकडे सादर करायचे आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाला भेट दिली. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याची मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भूसंपादन प्रक्रियेतील प्रगतीचे सादरीकरण केले होते.  सध्या नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामासोबत धावपट्टीच्या विस्ताराचे काम सुरू असून, पुढील वर्षी मार्चअखेर ही इमारत तयार होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या