Hasan Mushrif: कागलमध्ये अनपेक्षित राजकीय पलटीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः खुलासा करत “ईडीचा संभ्रम दूर झाला, त्यामुळेच आघाडी शक्य झाली,” असा थेट उल्लेख करून नवी राजकीय खळबळ उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची कागल नगरपालिकेत झालेली अनपेक्षित युती ही गैरसमज, दबाव आणि संघर्षाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची पावले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की उद्या 18 डिसेंबर रोजी मटकरी हॉलमध्ये ते आणि समरजितसिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत. “आता आपली जबाबदारी एकच राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करणे. बाकी मन मोकळं पत्रकार परिषदेतच करीन.”
स्वत:च्या, संजयबाबांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा नाही
मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकातून स्वीकारले की ही युती इतक्या अचानक झाली की स्वतःच्या कार्यकर्त्यांपासून ते मित्र मानल्या जाणाऱ्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा होऊ शकली नाही. “यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते स्पष्टपणे म्हणाले. परंतु या आघाडीच्या मूळ कारणांबाबत मुश्रीफ यांनी केलेला सर्वात ठळक आणि लक्षवेधी उल्लेख म्हणजे ‘ईडीच्या भीतीचा काहीसा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होता, पण चर्चा केल्यानंतर तो दूर झाला’. मुश्रीफ म्हणाले की, ही आघाडी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर कागल शहर–तालुका विकासासाठी, निरर्थक संघर्ष संपवण्यासाठी आणि जनतेला जास्तीत जास्त देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांच्यासोबतची ही नवीन जोडी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर भविष्यातील स्थैर्यासाठी असल्याचेही त्यांनी सूचित केले.
ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही
इतकेच नव्हे तर, कागलमध्ये अशी राजकीय पुनरावृत्ती पहिल्यांदाच होत नसून, शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून ते स्वतः आणि संजयबाबा घाटगे यांनीही पूर्वी अशाच टोकाच्या संघर्षानंतर तालुक्याच्या हितासाठी हातमिळवणी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला? या प्रश्नांवर पडदा टाकत मुश्रीफ यांनी आश्वासन दिले की, “ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही. उलट कार्यकर्त्यांना जादा दिलासा मिळेल, यासाठी मी स्वतः शिर्षस्थ नेतृत्वाशी बोलणार आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या