Ambabai Murti : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची पाहणी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाल्याने राज्य पुरातत्व विभागाकडून 28 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यात आल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी मंदिरात मूर्तीची पाहणी केली.
केंद्रीय पुरातत्त्व लवकरच अहवाल सादर करणार आहे, या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, पाहणीनंतर सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
याआधी राज्य पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीची पाहणी
अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून तिचे संवर्धन तात्काळ व्हावे, अशी मागणी झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल पाठवल्यानंतर आजची पाहणी झाली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, श्रीपूजक मंडळाचे माधव मुनीश्वर आदी उपस्थित होते.
दुसरीकडे, श्री अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत आता तरी कुठलाही खेळखंडोबा करु नये, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी आल्याची माहिती मिळताच ते मंदिरात आले आणि त्यांनी याबाबतची विचारणा अधिकाऱ्यांना केली; मात्र, मूर्तीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या