Lumpy Skin Disease : पशुधनांमधील लम्पी चर्मरोगाचा प्रकोप वाढतच चालल्याने स्थानिक प्रशासनाकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वेग देण्यात आला आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. 


शहरामध्ये 1297 भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या 133 जनावरांना लस देऊन त्यांना लाल रंगाची निशाण करण्यात आलं आहे. लम्पी चर्मरोग हा गाय वर्गीय जनावरांमध्ये गाय, वासरू व बैल या जनावरांमध्ये संक्रमित होत आहे. हा वाढता प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य व महापालिका  यांचेमार्फत शहरातील सर्व गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.


या मोहिमेअंतर्गत शहरातील संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्यात आले. यासाठी महापालिका व पशुसंवर्धन विभागामार्फत शहरामध्ये पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. या लसीकरणासाठी कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रवींद्र वडगावे, डॉ. किरण उनवणे, डॉ प्रविण नाईक व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व कर्मचाऱ्यांनी केले.
तसेच शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांची जनावरे पाणवट ठिकाणी, रस्त्यावर अथवा चरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सोडू नये. त्याचबरोबर अजूनही कोणाच्या गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी 9766532051 या नंबरवर शहरातील नागरिकांचे नाव, पत्ता व जनावरांची संख्या वॉटस्अप करावी.


कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 109 जनावरे बाधित


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच असून आतापर्यंत 108 जनावरे बाधित  झाली आहेत. आजपर्यंत मृत झालेल्या 9 पशुधनाचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 गायी व 3 बैल आहेत. दरम्यान, बाधित जनावरांची संख्या वाढतच चालल्याने पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचे लसीकरण व आजारी जनावरांवर उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन राहुल रेखावार यांनी केलं आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गाय वर्ग पशुधन 2 लाख 83 हजार 637 एवढे आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेल्या पाच एपिक सेंटरमध्ये एकूण बाधित गाय वर्ग पशुधनाची संख्या 108 झाली आहे. त्यापैकी 88 गायी व 20 बैल आहेत. जिल्ह्यात अॅक्टिव्ह आजारी पशुधनाची संख्या 76 आहे. आजपर्यंत मृत झालेले पशुधन 9 असून त्यापैकी 6 गायी व 3 बैल आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या