कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवाँधार पावसाची बरसात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कुंभी, कासारी नदीला पूर आला आहे. पंचगंगा नदी 37 फुटांवर पोहोचली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या धरण क्षेत्रातील धुवाँधार पावसाने नद्यांसह धरणांच्या पाणी साठ्यामध्ये सुद्धा वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद पन्हाळा तालुक्यामध्ये झाली. पन्हाळा तालुक्यामध्ये 57.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून एक लाख क्सुसेकने विसर्ग सुरु असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजीतून कर्नाटकशी संपर्क तुटण्याची शक्यता
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सुद्धा तयारी सुरू करण्यात आली आहे. संभाव्य पूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजीचा कर्नाटकशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक कागलकडे जाणाऱ्या मार्गावर यशोदा फुलाचे काम सुरू आहे. मात्र, काम अपूर्ण असल्याने पर्यायी मार्ग बंद पडणार आहे. त्यामुळे इचलकरंजीचा कर्नाटकच्या असलेल्या संपर्क करण्यासाठी तुटण्याची शक्यता आहे. कागलकडे जाण्यासाठी इंगळी पट्टणकोडोली मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
राधानगरी धरणामध्ये 6.5 टीएमसी पाणीसाठा
दरम्यान, धुवाँधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरणामध्ये 6.5 टीएमसी पाणीसाठा झाला. म्हणजेच 74 टक्के अधिक धरण भरलं आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी 1421 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये राधानगरी धरण भरण्याची शक्यता आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 14.3 पीएमसी पाणीसाठा झाला असून म्हणजेच 56 टक्के धरण भरलं आहे.
पंचगंगेची पाणी पातळी वाढल्यास किती फुटांवर कोणत्या भागात पाणी
इतर महत्वाच्या बातम्या