कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू होती. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून तर माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही विद्यमान खासदारांना कोल्हापुरात उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.
दोन्ही विद्यमान खासदारांना संधी
त्यामुळे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अशी लढत होईल, तर हातकणंगलेमध्ये माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत होईल. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार अशी चर्चा रंगली होती. भाजपकडून या दोन्ही जागेवर दावा करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर कोल्हापूरमध्ये पर्यायी नावाचा विचार सुरू झाला होता. त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा होती. मात्र, अखेर शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी बळ लावत त्यांना उमेदवारी दिली आहे. माने यांचा सुद्धा पत्ता कट केला जाणार अशी चर्चा होती. त्या ठिकाणी राहुल आवाडे, शौमिका महाडिक आणि विनय कोरे यांच्या नावावर चर्चा होती. मात्र, माने यांनी उमेदवारीमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील दोन्ही लढतीचे चित्र स्पष्ट झाल आहे. कोल्हापूर आणि हातकण लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे, तर निकाल चार जून रोजी असेल.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवल्यानंतर त्यांच्याविरोधातील उमेदवार ठरत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. इतकेच नव्हे तर भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. संजय मंडलिक कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपकडून धैर्यशील माने यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीबाबत संभ्रम सुरु झाल्यानंतर आणि भाजपकडून सुरु असलेल्या दावे प्रतिदाव्यांमुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने गॅसवर होते. त्यामुळे उमेदवारीसाठी कोल्हापूर ते मुंबई पळापळ दोन्ही खासदारांची सुरु होती.
इतर महत्वाच्या बातम्या