Kolhapur News : खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात घडली. सुदैवाने बाळाची आणि आईची तब्येत बरी असून ते सुखरुप आहेत. निपाणी-मुरगूड (Nipani-Murgud Road) रोडवरील यमगे गावामध्ये मध्य प्रदेशातून ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील ही मजूर महिला होती. प्रवासादरम्यान खराब रस्त्यामुळे तिला प्रसुती कळा सुरु झाल्या आणि रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतिणीला यानंतरमुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


खराब रस्त्यामुळे प्रसुती कळा, रुग्णवाहिका येण्यापूर्वीच बाळाला जन्म


रयत साखर कारखान्याकडे 32 मजूर ऊस तोडणीचे काम करत आहेत. त्यांचे सध्या कासेगावात वास्तव्यास आहे. सायंकाळी तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेने ते निघाले होते. ही मंडळी शुक्रवारी (3 मार्च) नऊच्या सुमारास यमगेजवळ आल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. महिलेला त्रास होत असल्याचे समजताच तातडीने ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी 108 रुग्णवाहिकेस कॉल केला. त्यानुसार सेनापती कापशीमधून रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याकडेलाच शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला. किरण केसू पालवी (रा.खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. 


यानंतर यमगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बाळ बाळंतिणीचा जीव धोक्यातून बाहेर आला. गेले कित्येक दिवस यमगे मुरगूड दरम्यानचा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. हा खराब रस्ता या माय लेकांच्या जीवावर उठल्याने आता तरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


खुरप्याने नाळ कापली 


अत्यंत भीषण अवस्था म्हणजे सुविधा नसल्याने टोळीतील लोकांनी बाळाची नाळ खुरप्याने कापली होती. यानंतर यमगे गावातील आशा स्वयंसेविकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन महिलेला रुग्णालयाकडे पाठवण्याचे सोपस्कार केले. काही वेळात डॉ. रुपाली लोकरे, आशासेविका सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले आणि त्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या या दोघांवर इथे अधिक उपचार सुरु असून बाळ आणि आई सुरक्षित आहेत. सध्या फोंडा-निपाणी राज्यमार्गाची प्रचंड दूरवस्था आहे. मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अशा मार्गावरुन ही गर्भवती महिला ट्रॅक्टरमधून प्रवास करत होती. 


इतर महत्वाच्या बातम्या