Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सर्वच तालुक्यातून मोठी गर्दी झाली. ऑनलाईन खोळंबा झाल्यानंतर ऑफलाईन परवानगी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली. सरपंच तसेच सदस्य पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यात सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी चुरस दिसून आली.
जिल्ह्यात 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल अर्जांची सोमवारी 5 तारखेला छाननी होणार आहे. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
दरम्यान, याच निवडणुकीतून विधानसभेसाठी गटातटाचे राजकारण निश्चित होणार असल्याने चांगलीच ईर्ष्या पुढील 15 दिवस पाहण्यास मिळेल यात शंका नाही. कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्येही निवडणूक होत असल्याने वेगळीच चुरस निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या गावांनाही थेट जनतेमधून सरपंच मिळणार आहे.निवडणूक स्थानिक पातळीवर आणि गल्लीच्या राजकारणावर होत असल्या, तरी थेट सरपंच निवड असल्याने आपला गट मजबूत करण्यासाठी आजी माजी आमदार तसेच खासदारही सक्रीय झाले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये आपलाच सरपंच व सत्ता असावी यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
तीन गावांमध्ये सरपंचपद बिनविरोध
एका बाजूने सरपंचपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली असताना बिनविरोध निवडीचे सुखद चित्र पाहायला मिळाले. असळज, कोदे बुद्रुक तसेच वेसर्डेत सरपंच बिनविरोध झाले आहेत. दुसरीकडे गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे आणि बटकणंगले जितक्या जागा तितकेच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणुकीची औपचारिकता राहिली आहे.
कोणत्या तालुक्यातून किती अर्ज दाखल?
तालुका | सरपंच | सदस्य |
शाहूवाडी | 204 | 1151 | |
पन्हाळा | 261 | 1599 | |
हातकणंगले | 305 | 2446 | |
शिरोळ | 127 | 822 | |
करवीर | 376 | 2534 | |
गगनबावाडा | 81 | 300 | |
राधानगरी | 392 | 2358 | |
कागल | 175 | 1256 | |
भुदरगड | 250 | 1449 | |
आजरा | 169 | 879 | |
गडहिंग्लज | 192 | 1071 | |
चंदगड | 170 | 925 |
इतर महत्वाच्या बातम्या