Jaysingrao Pawar on Raj thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत चर्चा झाली होती का? अशी विचारणा केल्यानंतर डाॅ. जयसिंगराव पवार (Jaysingrao Pawar on Babasaheb Purandare) यांनी भेटीत दोन तीनवेळा उल्लेख झाल्याचे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला सगळाच इतिहास खोटा आहे असं कसं म्हणून चालेल? असे म्हणाले होते. दरम्यान, या विधानानंतर विपर्यास केला जात असल्याचे सांगत पवार यांनी निवेदन प्रसिद्ध करत भूमिका स्पष्ट केली आहे.  


डाॅ. जयसिंगराव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी इतिहासकार म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचे गौरवीकरण करणारे विधान केलेलं नाही. आतापर्यंत लिखाणातून तसेच संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली असून त्यावर आजही ठाम आहे. मात्र, या संदर्भाने प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे म्हणून मी खुलासा करत आहे. 


राज ठाकरे यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली


जयसिंगराव पवार यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात भेटीची इच्छा व्यक्त केली. यावेळी इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटातून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरेंच्या कार्याचा उजाळा देत महत्व विषद केले. त्यांचा वारसा घेऊन आपण (राज ठाकरे) मुख्यमंत्री झाल्यास राज्यात धडाकेबाज काम कराल, त्याचे मी स्वागत करेन असे मी म्हणालो होतो. यावेळी पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावरून चर्चा झाली नाही.


दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर पवार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला होता. यावेळी बोलताना पवार यांनी राज ठाकरेंच्या हाती सत्ता गेल्यास जनतेला नवीन काहीतरी पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली होती, राज ठाकरे व्यक्ती म्हणून सत्यनिष्ठ वाटतात, लबाड बोलणारा, आशा पल्लवित करणारा वाटत नाही. भोंग्याचे उदाहरण देत जेव्हा एखाद्या विषयाला हात घालता त्यावेळी तो पूर्ण करा असेही राज यांना सांगितल्याचे पवार म्हणाले. 


राज यांच्यासोबत ही दुसऱ्यांदा भेट होती. राज काही ठरवून आले नव्हते. माझं संपूर्ण आयुष्य इतिहासाला वाहिलं आहे. त्यामुळे चर्चा इतिहासाभोवती झाली. सत्य इतिहास काय असतो, त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती कशा असाव्यात, कोणत्या तत्वानुसार असली पाहिजेत, हे मी त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या