Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सिद्धार्थनगरमधील दोन गटातील राडा प्रकरणात पोलिसांनी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोल्हापूर पोलिसांना यामध्ये 31 जणांना ओळख पटवण्यात यश आलं आहे. नंगानाच करणाऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या विविध किमान पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पोलिसांकडून जमावबंदी आदेश उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी दगडफेक, मालमत्ता नुकसान, शस्त्र नाचवून दहशत माजवणे, पोलिस आदेशांचे उल्लंघन आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारत तरुण मंडळाच्या फलक आणि डीजे लावण्यावरून झालेल्या दोन गटांच्या नंगानाचात जाळपोळ आणि तुंबळ दगडफेक करण्यात आली. यामध्ये 8 ते 10 वाहनांचे सुद्धा नुकसान करण्यात आले. यामध्ये लाखभर रुपयांचे नुकसान झालं आहे. या दगडफेकीत पीएसआयसह 10 जण जखमी झाले होते. 

दोन्ही गटाकून सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार

दुसरीकडे, दोन्ही गटात सलोखा कायम राहण्यासाठी काल कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही गटाकून सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दोन मंडळातील वादात हा प्रकार घडल्याचे दोन्ही गटांनी मान्य केले. दोन्ही गटातील मान्यवरांकडून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशा प्रकारे आमचा वाद यापूर्वीच कधीच नव्हता, अशी भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादानंतर शनिवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. तब्बल 400 हून अधिक जणांचा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. 

कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

शुक्रवारी एका मंडळाकडून 31व्या वर्धापनदिनी फलक उभारण्यात आला. तसेच ध्वनिक्षेपक उभारुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित मंडळाची ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेतली. यानंतर दोन्हीकडील तणाव निवळला होता. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास मंडळाकडून पुन्हा मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी करण्यात आली. त्यानंतर वर्धापनदिनाचे पुन्हा आणखी तीन नवे फलक उभारण्यात आले. संध्याकाळी नऊच्या सुमारास मंडळाकडून साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे काही वेळानंतर या सर्व घडामोडी आगीत तेल ओतणाऱ्या ठरल्या. 

आतषबाजी करण्यात आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही गटात तुंबळ दगडफेक करण्यात आली. यानंतर सुमारे पाऊण तास दोन्हीकडून हिंसक झडप सुरु होती. दोन्ही गटाकडून तुंबळ दगडफेक करू वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मर्यादित पोलिसांमुळे जमाव नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र होते. संध्याकाळी सव्वा दहाच्या सुमारास  पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल झाला. दंगल नियंत्रक पथकेही तैनात करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दोन्हीकडील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न झाला. संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. यावेळी महिला आणि लहान मुलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

इतर महत्वाच्या बातम्या