Kolhapur News: कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन गटामध्ये डीजे आणि फलक लावण्यावरून प्रचंड दगडफेक करत नंगानाच करण्यात आला. दिवसभर दोन्ही गटामध्ये वाद धुमसत असताना संध्याकाळी या वादाचे पर्यवसन दोन्ही गटातील तुंबळ दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यापर्यंत गेले. काही हल्लेखोरांनी वीजांच्या तारांवर हल्ला केल्याने परिसरातील वीजपुरवाठ खंडित झाला. त्यामुळे अंधारात कोण कोणावर हल्ला करतोय आणि कोण कोणावार दगड फेकतोय याचा कोणताही अंदाज येत नव्हता. हल्ल्यावेळी महिला आणि मुलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे पोलिसांची जमावाला पांगवताना चांगलीच दमछाक झाली.

Continues below advertisement


जमावाच्या हल्ल्यात पीएसआयसह आठ जखमी


दरम्यान, दोन गटात झालेल्या हिंसक झडपमुळे पीएसआयसह 8 जण जखमी झाले. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जमावाने परिसरात लावण्यात आलेली वाहने सुद्धा लक्ष्य केल्याने परिसरात दगडांचा आणि काचांचा ढीग पडला. दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे जखमी झाले. तसेच अंमलदार आबिद मुल्ला तसेच नागरिकांमध्ये परहाज नायकवडी, निहाल शेख, सद्दाम महात, अशफाक नायकवडी, इकबाल सरकवासह अन्य एक नागरिक जखमी झाला.


पोलिसांकडून 150 जणांविरोधात गुन्हा दाखल 


दरम्यान, दोन्हीकडील जमावाने केलेल्या हल्ल्यात 8 ते 10 वाह नांचे नुकसान झाले. एका वाहनाला आग सुद्धा लावण्यात आली. मात्र, पोलिसांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान, पोलिसांनी दगडफेकीत सहभागी असणाऱ्या दोन्ही गटाकडील 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार सुद्धा यावेळी केला. मात्र, दोन्ही बाजूने आक्रमक झालेल्या जमावाला नियंत्रित करताना पोलिसांची मर्यादित फौज असल्याने चांगली दमछाक झाली. त्यानंतर पोलिसांच्या अनेक तुकड्या मागवण्यात आल्या. त्यानंतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होताच दोन्ही बाजूकडील होणारी दगडफेक नियंत्रणात आली आणि जमाव पांगला गेला. संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय परत जाणार नाही अशी भूमिका काही लोकांनी घेतली. त्याचबरोबर ध्वज फाडणाऱ्याला समोर अशी सुद्धा मागणी करण्यात आली. समोरून थांबलेल्या जमावाला पोलिसांकडून घरी जाण्यासाठी विनवणी करण्यात येत होती. मात्र दोन्हीकडून कोणत्याही प्रकारची ऐकण्याची मन:स्थिती नव्हती. कमानीजवळ झेंडा पुन्हा लावण्यात आल्यानंतर वाद काहीसा निवळला. 


कोल्हापुरात नेमकं काय घडलं?


शुक्रवारी एका मंडळाकडून 31व्या वर्धापनदिनी फलक उभारण्यात आला. तसेच ध्वनिक्षेपक उभारुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित मंडळाची ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेतली. यानंतर दोन्हीकडील तणाव निवळला होता. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास मंडळाकडून पुन्हा मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी करण्यात आली. त्यानंतर वर्धापनदिनाचे पुन्हा आणखी तीन नवे फलक उभारण्यात आले. संध्याकाळी नऊच्या सुमारास मंडळाकडून साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे काही वेळानंतर या सर्व घडामोडी आगीत तेल ओतणाऱ्या ठरल्या. 


आतषबाजी करण्यात आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही गटात तुंबळ दगडफेक करण्यात आली. यानंतर सुमारे पाऊण तास दोन्हीकडून हिंसक झडप सुरु होती. दोन्ही गटाकडून तुंबळ दगडफेक करू वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मर्यादित पोलिसांमुळे जमाव नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र होते. संध्याकाळी सव्वा दहाच्या सुमारास  पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल झाला. दंगल नियंत्रक पथकेही तैनात करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दोन्हीकडील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न झाला. संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. यावेळी महिला आणि लहान मुलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता.


इतर महत्वाच्या बातम्या