Kagal Nagar Parishad Election: कागल नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकावर एक उलटफेर सुरूच आहेत. पहिल्यांदा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी अनपेक्षितरित्या नगरपरिषद निवडणुकीसाठी आघाडी केल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा बुचकळ्यात पडले होते. शिंदे गट एकाकी पडला असतानाच कागल नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी निवडणुकीतून थेट माघार घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ठाकरेंच्या शारदा नागराळे यांनी मतदानाच्या अवघ्या 48 तासापूर्वी युगंधरा घाटगे यांना जाहीर पाठिंबा दिला. मुश्रीफ घाटगे युतीनंतर कागलमधील राजकीय समीकरण वेगाने बदलत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकत्र आल्यानं कागलच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना कागल नगरपरिषदेमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडल्या आहेत.

Continues below advertisement

कागलच्या निवडणुकीमध्ये एकावर एक उलटफेर  

दुसरीकडे या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन देत नगरपरिषदेची निवडणूक संवेदनशील म्हणून जाहीर करावी अशी मागणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागलच्या निवडणुकीमध्ये एकावर एक उलटफेर सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. पहिल्यांदा हसन मुश्रीफ आणि घाटगे यांनी एकत्रित येत कार्यकर्त्यांना झटका दिल्यानंतर प्रचारामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना इशारावजा धमकी देण्याचे सत्र सुद्धा दोन्ही नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक आता चर्चेची विषय झाली आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सुद्धा लक्ष असेल. 

संजय मंडलिक यांना मोठा झटका बसला

माजी खासदार संजय मंडलिक यांना कागलच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. त्यांनी घाटगे-मुश्रीफ यांच्या युतीवर सडकून प्रहार केला होता आणि ईडीपासून वाचण्यासाठी आणि नगरपरिषदेला दिलेला भूखंड परत घेण्यासाठी या दोघांची युती झाल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला होता. त्यामुळे कागलच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. मतदारांचे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून या आरोप प्रत्यारोपांमध्ये डोकं भंजाळून गेलं आहे. मतपटीमध्ये कोणाला झटका देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या