Kolhapur Crime: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. आज (1 डिसेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास 30-35 वर्षीय तरुणाचा हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. या संदर्भात पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
विद्युत खांबाला बांधलेला अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडवर मध्यरात्री रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला तरुणाचा बांधलेला अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. विद्युत वायरीने त्याचा मृतदेह खांबाला बांधण्यात आला होता. पोलिसांना घटनेची मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाची स्थिती पाहता हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपासानंतर स्पष्टता येणार आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. उपनगरांमध्ये वाढलेली दहशत हा सुद्धा चिंतेचा विषय झाला आहे.
स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाने घेतली पंचगंगेत उडी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोलहापुरात 'मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. ‘दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत सुमित विक्रांत तेली (वय 30, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या तरुणाने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी मृतदेह सापडला. तो शुक्रवार पेठेत आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होता. शाहूपुरीत त्याचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफी तयार करण्याचे दुकान होते.
'दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया'
बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्याने व्हॉटस्ॲप स्टेटस बदलत 'मला माझ्या चारित्र्याचा अभिमान आहे. दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,' असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे त्याच्या ओळखीतील व्यक्तींनी पाहिले. याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाइकांना दिली. अग्निशामक दलाच्या जवानांसह करवीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवली. साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शिवाजी पुलापासून काही अंतरावर सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
इतर महत्वाच्या बातम्या