Aaditya thackeray on Kolhapur visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता शिवसेनेला पुन्हा एकदा सावरण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 


आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताना थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. 


1 ऑगस्टला संध्याकाळी आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर हेसुद्धा शिंदे त्यांच्यासोबत दिसल्याने  ते सुद्धा बंडखोरी करणार का? याची चर्चा रंगली आहे.  


या सर्व परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची बांधणी करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन खासदार असावेत हे नेहमीच बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले. मात्र, या स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षांमध्ये सुरुंग लागला आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्याने हे दोन्ही खासदार शिंदे गटाला मिळाले आहेत. 


त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक एका बाजूला आणि जिल्ह्यातील सैनिकांच्या जीवावर झालेले आमदार खासदार एका बाजूला असे सध्या एकंदरीत चित्र आहे त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या