कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या योजनेला खोडा कसा घालायचा, ही योजना कशी बदनाम करायची याबाबत सातत्याने ते प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.


आंदोलकांनी सात ते आठ तास रेल्वे रोखली, हे कुठलं आंदोलन?


ते म्हणाले की आंदोलन बदलापूरमध्ये झालं त्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादं आंदोलन स्वयंस्फूर्तीने सुरू असताना तिथं लाडकी बहीण योजनेचे बॅनर आणले गेले. आंदोलकांनी सात ते आठ तास रेल्वे रोखली, हे कुठलं आंदोलन? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काहीही खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशी पद्धत विरोधकांनी अवलंबली असून नक्कीच त्यांना सडेतोड उत्तर लाडक्या बहिणी देतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.


म्हणून दीड कोटी बहिणींनी फॉर्म भरले


योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अतिशय यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडला. खऱ्या अर्थाने योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत याचं समाधान सरकारला असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितल. या योजनेसाठी आर्थिक वर्षाची तरतूद केली आहे आणि त्यामुळे कोणीही शंका घेण्याचं कारण नाही.विरोधक योजनेबद्दल खोटं नाट पसरवत आहेत. अनेक शंका व्यक्त करत आहेत, सर्व बहिणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून दीड कोटी बहिणींनी फॉर्म भरले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.


कोणीही गुन्हेगार असला तर त्याला शिक्षा केली जाईल


दरम्यान, कोल्हापूरमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की कोणालाही सोडलं जाणार नाही. कोणीही गुन्हेगार असला तर त्याला शिक्षा केली जाईल. याची माहिती गृहमंत्र्यांनी घेतली आहे.


दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर बोलताना सांगितले की, कोल्हापूरमध्ये बिहार कुटुंबातील संबंधित मुलगी तिच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने घरातून बाहेर पडली. त्यांना सायंकाळी ती मुलगी सापडत नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी रात्री शोध घेतला असता तिचा सकाळी मृतदेह सापडला. लैंगिक अत्याचार झाले असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काही संशयितांना पकडलं असून त्यांची चौकशी सुरू असून पीडित परिवाराला योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या