कोल्हापूर : कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या दोन घटनांवरून देशभरात संताप आणि उद्रेक सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये सुद्धा भयंकर कृत्य समोर आलं आहे.
शिये गावातील रामनगर परिसरामध्ये धक्कादायक घटना उघडकीस
कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धकादायक उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत? हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोलकात्याच्या घटनेनंतर पश्चिम बंगालसह देशभरामध्ये उद्रेक
कोलकात्याच्या घटनेनंतर पश्चिम बंगालसह देशभरामध्ये उद्रेक सुरू असतानाच राज्यात बदलापूरमध्ये शाळेमध्येच दोन मुलींवर अत्याचार करण्याची घटना घडली. यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी तब्बल 12 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता आणि शाळेवर सुद्धा दगडफेक केली होती. आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली होती. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यामध्ये संतप्त वातावरण असतानाच आता कोल्हापूरमध्ये सुद्धा चिमुरडीची अत्याचार करून हत्या झाल्याची घटना घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
एवढा बेफिकीरपणा 30 वर्षांत दिसला नाही
दरम्यान, कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयने न्यायालयात सांगितले की, गुन्ह्याच्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जेबी परडीवाला म्हणाले की, कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर शंका आहे. माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत तपासात इतका निष्काळजीपणा मी कधीच पाहिला नाही.
CJI डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, डॉक्टरांनी कामावर परतावे. रुग्णालयांची स्थिती मला माहीत आहे. माझ्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असताना मी स्वत: सरकारी रुग्णालयाच्या जमिनीवर झोपलो आहे. आम्हाला अनेक ईमेल मिळाले आहेत ज्यात डॉक्टरांनी त्यांच्यावर खूप दबाव असल्याचे सांगितले आहे. 48 किंवा 36 तासांची ड्युटी चांगली नाही. आम्ही ते आज आमच्या ऑर्डरमध्ये जोडू.
इतर महत्वाच्या बातम्या