Rohit Pawar In Belgaum : मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. रोहित पवार यांनी आज अचानक बेळगाव दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलताना भाजपवर तोफ डागली. रोहित पवार म्हणाले की, बेळगावात गेल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच्या नेत्यांशी, नागरिकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण शरद पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर वातावरण बदलून गेले. पवार साहेबांचा संवाद अनेक वर्षांपासून सीमाभागात (maharashtra karnataka border dispute) आहे. कार्यकर्त्यांना डांबण्याचा प्रयत्न होत होता, पण पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर परिस्थिती निवळली आहे.
भाजपचे नेते सांगूनही बेळगावला का गेले नाहीत
ते पुढे म्हणाले की, बेळगावला जाण्यासाठी वेगळं कारण नव्हतं. माझे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत. आपलं घर असल्यासारखं वाटतं. त्यामुळे कुणाला विचारण्याची गरज नाही. केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकात अशी तिन्हीकडे भाजपची (BJP) सत्ता आहे. दोन तारखा देऊनही सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? कर्नाटकच्या (maharashtra karnataka border dispute) पत्रानंतर मंत्री जात नसतील, तर सीमाभागात योग्य संदेश जात नाही. भाजपचे नेते सांगूनही बेळगावला का गेले नाहीत, हे अगोदर सांगावे.
रोहित पवार यांनी सांगितले की, अनेक लोकांना मी आलेलो माहीत नव्हतं. अनेकजण येऊन भेटले. बोलताना जय महाराष्ट्र म्हणाले, ही अस्मितेची लढाई असून आम्ही ती लढत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बंगळूरमध्ये शिवरायांचा अवमान झाल्यानंतर आम्ही निदर्शने करण्यास परवानगी मागितली तेव्हा 45 दिवस बेळगावमधील कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आले. हे अस्मितेच्या विरोधात असल्याने लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल?
दरम्यान, रोहित पवार यांनी महापुरुषांचा वारंवार अवमान होत असेल, तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल? अशी विचारणा केली. ते म्हणाले की, पुण्यातील बंदला छोटे दुकानदार व्यापारी यांनी सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अस्मिता टिकवण्यासाठीच लोक एकत्र आले आहेत. राज्यपाल पत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले. मात्र, माफी मागितली नाही. अमित शहा यांच्याऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते.संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला लोकं माफ करणार नाहीत. अशी किती पत्र लिहिले तरी लोक माफ करणार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या