कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात असल्याने जोरदार चुरस आहे. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय मंडलिक महाराजांविरोधात रिंगणात आहेत. संजय मंडलिक आणि हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली आहे. दुसरीकडे, शाहू महाराजांचा महाविकास आघाडीकडून ताकदीने प्रचार सुरु आहे. 


2019 मध्ये काय घडले होते?


कोल्हापूरमधील दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असं स्वप्न पाहणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले होते. कोल्हापूर संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही खासदारांनी शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. दुसरीकडे, आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिक यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांची यंत्रणा संपूर्ण राबली होती. त्यामुळे धनंजय महाडिक यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाला होता.


गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेल्याने राजकीय संदर्भ बदलले गेले आहेत. महाडिक यांनी भाजपत प्रवेश राज्यसभेवर खासदार आहेत, तर संजय मंडलिक शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. 


मंडलिकांना 2019 मध्ये कोणत्या मतदारसंघात किती मतदान 



  • चंदगड विधानसभा 120857

  • राधानगरी भुदरगड - 126160 

  • कागल - 148727 

  • कोल्हापूर दक्षिण - 127175 

  • करवीर - 120864 

  • कोल्हापूर उत्तर - 101892


कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीरमध्ये आव्हान 


2019 मध्ये संजय मंडलिक यांना मिळालेल्या मतांमध्ये सतेज पाटलांच्या ताकदीचा सुद्धा मोठा वाटा होता. आज कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर असे तिन्ही काँग्रेस आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये शाहू महाराजांचा प्रचंड पभाव आणि सतेज पाटील यांचीही ताकद असल्याने संजय मंडलिक यांना ताकद लावावी लागणार आहे. या तिन्ही मतदारसंघात साडे दहा लाखांवर मतदार आहेत. मंडलिक यांना 2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते.


कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार असून मंडलिक यांचाही गड समजला जातो. समरजितसिंह घाटगे यांची सुद्धा ताकद आहे. चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. त्यामुळे 2019 मध्ये घेतलेल मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान मंडलिकांसमोर असेल. 


मुख्यमंत्र्यांची समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा


दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या सभेनंतरही शनिवार रात्री कोल्हापूरमध्ये उशीरापर्यंत जोडण्या लावल्या होत्या. नेत्यांशी चर्चा करत मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली होती. भाजप नेते आणि हसन मुश्रीफ यांच्याशी कट्टर राजकीय वैर असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत त्यांनी बंद खोलीत जवळपास पाऊणतास चर्चा केली होती. यामागे कागलमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये नाराजी राहू नये यासाठी आटोकाट प्रयत्न होता. 


इतर महत्वाच्या बातम्या