Kolhapur Rain: कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला तीन दिवसात दुसऱ्यांदा धुवाँधार वळीव पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर झालेल्या पावसाने अक्षरश: धुमशान घातले. विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या तीन दिवसात आज दुसऱ्यांदा धुवाँधार पाऊस झाला. 


कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही क्षणामध्ये मंदावली गेली. तीन दिवसांमध्ये दोनवेळा झालेल्या दमदार वळीव पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह उभी पीकेही संकटात आली होती. कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गेल्या अनेक दिवसांपासून विपरित परिणाम झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भोगावती आणि पंचगंगा नदीने तळ गाठला आहे. 


या पार्श्वभूमीवर जोरदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासाठी उपसा बंदी करण्यात आल्याने नदीकाठची पिके पूर्णत: धोक्यात आली होती. मात्र, दमदार वळीव पावसाने उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेष करून या वळीव पावसाचा मोठा लाभ होणार आहे. भाजीपाल्याला सुद्धा चांगलाच लाभ होणार आहे. 24 मेपासून रोहिणी नक्षत्र सुरु होत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतींना सुद्धा वेग आला आहे. तत्पूर्वी, दमदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. 


दुसरीकडे, कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, वळीव पावसाचा जोर असाच राहिल्यास या कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामाची बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली आहे. पाटील यांनी कामाच्या ठिकाणी  भेट देत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच कामाची सद्यस्थिती याची माहिती घेत काम शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या