कोल्हापूर : माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सुद्धा मानसिक धक्का बसला. सर व्यासपीठावरून गाणं म्हणत असतानाच असा भयावह प्रसंग घडल्याने क्षणात कार्यक्रमात शोककळा पसरली. 

Continues below advertisement


माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता


कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी ही घटना घडली. विनायक सखाराम कुंभार (वय 78) असे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी 2001-2002 च्या दहावीच्या बॅचने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. शंभरहून अधिक विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी निवृत्त शिक्षकांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. 


कुंभार सरांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला


हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचवेळी कुंभार सर भाषणाला उभा राहिले. मनोगत व्यक्त करत असताना गीत गाण्यास सुरुवात केली. इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे हे गाणे म्हणत असताना कुंभार सरांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. मनोगत व्यक्त करत असलेल्या ठिकाणीच कुंभार सर कोसळले. विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच सरांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनेने माजी विद्यार्थ्यांना देखील मोठा धक्का बसला.


इतर महत्वाच्या बातम्या