Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. उद्या (12 मार्च) मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांना सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तिसऱ्यांदा झालेल्या छापेमारीनंतर मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उद्या सोमवारी थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.  


पाच जणांचे घेतले जबाब


ईडीकडून मुश्रीफांच्या निवासस्थानी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांनी कोणतीही कागदपत्रे यावेळी सोबत नेलेली नाहीत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्यासंदर्भात माहिती घेतली असल्याचे समजते.  


कार्यकर्त्यांमध्ये धास्ती 


मुश्रीफांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागल्यापासून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ईडीकडून चौकशीसाठी समन्स कार्यकर्ते चांगलेच धास्तावले आहेत. ईडीची आजवरची कार्यपद्धती पाहता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का? अशीही भीती त्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांसह कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत मुश्रीफांची थेट चौकशी झालेली नाही. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 


ईडीचा दावा काय?


मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या