Hasan Mushrif: राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाळीनंतर अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्याने भुवया उंचावल्या आहेत. छगन भुजबळ शिवसेनेत बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी नेहमीच सन्मान केला होता. दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ सुद्धा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, ईडीच्या जाळ्यात अडकल्यानंतर मुश्रीफ गेल्या सहा महिन्यांवर गॅसवर आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय निष्ठा बदलली आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुश्रीफांच्या राजकीय पलटीने आता त्यांच्याविरोधात ईडीकडून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याची धार सुद्धा बोथट झाली आहे का? याचाच प्रत्यय हसन मुश्रीफ यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत गुरुवारी आला. 


ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मात्र, हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे. 22 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्यात अपेक्षित असलेला तपास अहवाल पुढील सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मुश्रीफांच्या पलटीने वकीलही गोंधळले!


अजित पवारांनी पक्षात बंडाळी करून त्यांनी भाजपला मांडीला मांडी लावल्यानंतर हसन मुश्रीफही सोबत जाऊन कॅबिनेट मंत्री झाले आहेत. आता थेट मंत्रिमंडळामध्येच हसन मुश्रीफ समावेश झाल्याने सरकारी वकिलांना गुरुवारी सुनावणी करताना विचार करण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी सूचना घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती. सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्यानंतर तुम्ही मुश्रीफ यांच्या वतीने विनंती करत आहात का? अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यानंतर मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी महाराष्ट्र सगळ्यांसाठी प्रेरणास्थान झाल्याची कोपरखळी मारली. त्यामुळे एकच हशा पिकला. त्यामुळे मुश्रीफांच्या वकिलांना झालेला आनंद आणि सरकारी वकिलांची झालेली गोची बरंच काही सांगून गेली.


दुसरीकडे, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनाही 19 जुलैपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात ईडी मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशी करत आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी हसन मुश्रीफांची मुलं जावेद, आबिद आणि नाविद यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या