कोल्हापूर : निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा असल्याचा इशारा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिल्यानंतर आता महायुतीचे नेते कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Satej Patil on Hasan Mushrif) यांनीही जोरदार पलटवार केला आहे. 


आम्ही सुद्धा एक वाजेपर्यंत काठी घेऊन बसू


हसन मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटील बारा वाजेपर्यंत काठी घेऊन बसणार असतील तर आम्ही सुद्धा एक वाजेपर्यंत काठी घेऊन बसू. चुकीची विधान करण्यात अर्थ नाही. त्यांना काही त्रास झाला असेल किंवा धमकी दिली असेल तर पोलिसांना कळवावे, काठी घेऊन बसून काय होणार आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 


मोदींची अति विराट सभा होईल


दरम्यान, महायुतीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची शनिवारी सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी 27 तारखेला तपोवन मैदानावर मोदींची अति विराट सभा होईल, असा दावा केला. दोन्ही उमेदवारांचा निश्चित विजय होईल अशी मला खात्री असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. मोदींच्या सभेचा फार मोठा इम्पॅक्ट दोन्ही मतदारसंघावर पडेल. या सभेसाठी जवळपास अडीच लाख लोक येतील असं नियोजन आम्ही आजच्या बैठकीत केलं असल्याचेही त्यांनी सांगितले. 


परिणाम काय होईल ते जनताच ठरवेल


शाहू महाराज यांना एमआयएमने दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, वंचित आणि एमआयएमने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे, याचा परिणाम काय होईल ते जनताच ठरवेल.  काँग्रेसचे उमेदवार सर्वांचाच पाठिंबा घ्यायचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.


पार्थ पवार सुरक्षेवर काय म्हणाले?


राज्य सरकारकडून पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुश्रीफ यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्या सभेला गर्दी होत आहे, चेंगराचेंगरी होत आहे असे स्पष्टीकरण यावर याआधीच वरिष्ठांनी दिलं आहे. 


काय म्हणाले होते सतेज पाटील?


कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. शाहू महाराजांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, मी सुद्धा 25 वर्ष कसलेला पैलवान आहे. कोणाला कधी चितपट करायचं, हे मला माहीत आहे. कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनो माझ्या नादाला लागू नये, तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला तर बंटी पाटलांसोबत गाठ आहे हे लक्षात ठेवा. ज्यांच्यासाठी काम करत आहात, ते निवडणुकीनंतर तुमचा फोन सुद्धा उचलणार नाहीत. त्यानंतर मात्र मीच आहे, हे ध्यानात ठेवा. निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या