Hasan Mushrif: मी आयुष्यात कधी अपरिपक्वपणा केलेला नाही. कधीही विचलित झालेलो नाही. त्यामुळे मला कधी पेपर फाडण्याची, काच फोडण्याची, फोन बंद करण्याची कधी वेळ आली नाही, अशा शब्दात कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांनी केलेल्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिले. मी कोणाच्या पालापाचोळ्यावर पाय दिला नाही, माझी सहीसलामत सुटका होत गेली, सगळ्यांनी मला आशीर्वाद दिल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे प्रथमच आज कोल्हापुरात आगमन झाले. मुश्रीफ यांनी पवार एके पवार म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार एकच असल्याची प्रतिक्रिया दिली. 


आमची पालखी शरद पवारांकडेच जाणार आहे. आपण अजितदादांना साथ देऊया, जनतेचा मी आभारी आहे, जिल्ह्यामध्ये  राष्ट्रवादी भक्कम करुया, मी कोल्हापूरचा पालकमंत्री झालेलो नाही, पण जिल्ह्याचे पालकत्व पार पाडेन, असा विश्वास देतो, असेही ते म्हणाले.  कोल्हापूर ते कागल देवदर्शन आणि जंगी स्वागतानंतर मुश्रीफ यांचा कागलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना मुश्रीफ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणतेही भाष्य केले नाही.


अजित पवारांच्या माध्यमातून बोलणी करण्याचा प्रयत्न श्रेष्ठींनी केला


मुश्रीफ यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची स्थापना पवार साहेबांनी केली. असं काय घडलं आणि आम्ही  शिंदे सरकारमध्ये सामील झालो हे अजितदादांनी चांगलं भाषण करून सांगितले. त्यांनी 2014 पासून इतिहास मांडला. पहाटेचा शपथविधीवरही बोलले. या घटनांचा मी सुद्धा कसा साक्षीदार होतो, हे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये भाजपला पाठिंबा दिला, आम्ही आज त्यांना पाठिंबा देतोय असं नाही. 2017 मध्येही काय घडलं ते सांगितलं. 2019 काय घडलं ते सुद्धा सांगितलं. 2022 मध्येही काय घडलं ते सांगितल. माझा सहभाग कसा होता, ते सुद्धा सांगितलं.ईडीच्या धाकाने अजित पवारांकडे गेल्याचे बोलले जात आहे, पण ईडीचा मुकाबला कसा केला हे विधानसभेत सांगेन. आता सांगणार नाही. अजित पवारांच्या माध्यमातून बोलणी करण्याचा प्रयत्न श्रेष्ठींनी केला. अजितदादांना एकटं पाडायचं नाही, म्हणून निर्णय घेतला. मोदी पंतप्रधान होणार, त्यांना 2029 पर्यंत पर्याय नाही हे पवारांनी सांगितलं. देशाच्या विकासाठी आम्ही  पाठिंबा दिला. 


तत्पूर्वी, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील. शीतल फराकटे आदींनी मनोगत व्यक्त करताना मुश्रीफ यांनाच कागल मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आणूया असे आवाहन केले.


इतर महत्वाच्या बातम्या