Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील अकिवाट (ता. शिरोळ) येथील नियोजित सहकारी सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठा करण्याचा दाखला देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दाखला देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून जिल्हा बँकेच्या दारात उपोषण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मध्यरात्रीच उचलल्यानंतर वाद वाढला होता. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर हल्लाबोल करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा बँक परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


राजू शेट्टी यांनी सांगितले की, "अकिवाटमध्ये ज्या सेवा संस्था आहेत. त्या संस्थेतील काही सभासद नियोजित संस्थेचे सभासद होणार आहेत. त्या जुन्या संस्थांमधून कर्ज पुरवठा झालेला नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन दोन दिवसात नियोजित कर्ज पुरवठा करण्याचे पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन ही पत्रे संचालक मंडळासमोर ठेवून अपेक्षित पत्र देण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर कोणताही आक्षेप घेणार नाही किंवा चूक काढली जाणार नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे."


अकिवाट येथील संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठा करण्याचा दाखल्यासाठी जिल्हा बँकेकडे मागणी केली होती. जिल्हा बँकेकडून हा दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आंदोलनाचा पुढील भाग म्हणून जिल्हा बँकेवर हल्लाबोल आंदोलन केले जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या दारात उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मार्केटयार्डात ठेवले होते. यानंतर जिल्हा बँकेसमोर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रेखावार यांनी माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तोडगा काढला.


वादावर अध्यक्ष हसन मुश्रीफ काय म्हणाले?


दरम्यान, "अपेक्षित कर्ज पुरवठा करण्याचा दाखल देण्यासाठी ज्या संस्थांना पत्रे दिली आहेत, त्या सर्व संस्थांची मागणी पत्रे रितसर दिली जातील. राजू शेट्टी यांच्याशी यापूर्वी फोनवरुन झालेल्या चर्चेनुसार नियमात बसणारे अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला यापूर्वी दिला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. शेट्टी यांनी स्वत: जेवढे नियमात बसते तेवढे पत्र द्या, असे सांगितले होते. जिल्हा बँकेत ज्या-ज्या संस्थांना अशी पत्रे किंवा दाखला दिला जातो. त्या सर्व संस्थांना हा नियम लागू केला आहे. यासाठी शेट्टी यांनी जी कागदपत्रे मागितली आहेत. ती रितसर द्यायला तयार आहे," असं हसन मुश्रीफ या वादावर म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या