Kolhapur News : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 चे (Grand Agricultural Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी प्रदर्शन 23 ते 26 डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानात होणार आहे.
आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शन आयोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, हे प्रदर्शनाचे चौथे वर्ष आहे. यामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 200 पेक्षा अधिक पशू-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ज्ञां मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉलचा समावेश आहे. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. काही शेतकऱ्यांचा, स्टॉलना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे, पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत. यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, पांढरे उंदिर, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारची कुत्री, पक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत.
प्रदर्शनात अवजारे, बियाणे, फळे, फुले आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तूंचे 250 हून अधिक स्टॉल असतील. तसेच सरकारी योजनांची माहिती, वित्त साह्य, कमी खर्चात जादा उत्पन्नासाठी मार्गदर्शन, अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फुले, फळबाग लागवड, ऊसशेती, मत्स्य व्यवसाय, गूळ उत्पादनासह शेती व्यवसायसंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन होईल. महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंची विक्री केली जाईल. 24 डिसेंबरला अरुण देशमुख, सुरेश कवाडे यांचे मार्गदर्शन आहे. 25 डिसेंबरला डॉ. सॅम लुद्रिक यांचे जनावरांचे रोग व्यवस्थापन यावर तर अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय यावर मार्गदर्शन होणार आहे. अँग्रीकल्चर कॉलेजचे डॉ. अशोक पिसाळ, कृषी अधिक्षक जालींदर पांगरे, प्रा. जयवंत जगताप, विनोद पाटील, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते. (Grand Agricultural Exhibition)
इतर महत्वाच्या बातम्या