Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जनावरांचा बाजार भरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता गोकुळनेही पशूधन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 


गोकुळच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीचा पुरवठा करून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


मोफत लसीकरणाचे नियोजन


या निर्णयाबाबत माहिती देताना विश्वास पाटील यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी, एल.एस.एस. व कृत्रिम रेतन सेवक यांच्यामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन केले आहे. विश्वास पाटील यांनी गोकुळच्या पशुवैद्यकीय केंद्र येथे आवश्यक उपाययोजना, उपचाराच्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.  हातकणंगले तालुका व इचलकरंजी परिसर वगळता जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे.


एखाद्या गावात बाधित जनावरे आढळली तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. गोकुळमार्फत संबंधित जनावरांवरती आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. लम्पीस्कीन या संसर्गाविषयी उत्पादकांनी घाबरुन जाऊ नये, आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातही लम्पी चर्मरोगाचा शिरकाव


दरम्यान, कोल्हापूर जिह्यात पंधरा दिवसापूर्वी जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.  हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावातील काही जनावरे बाधित झाली आहेत. हा प्रकार समजताच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळ हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत अतिग्र्यात पोहोचले. जनावरांचा गोठा पाहिल्यानंतर उपचार करण्याविषयी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. तसेच इतर काही ठिकाणी बाधित जनावरे असतील, तर आवश्यक उपचारास तत्काळ सुरुवात करावी असे सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या