कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपये वाढ करण्यात आलीआहे. म्हशीच्या दूध खरेदी करण्यात वाढ केली असली, तरी गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोकुळ (Gokul) दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली आहे. उद्या (1 ऑक्टोबर) रविवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.


गायीच्या दूध खरेदी दरात कपात कशासाठी? गोकुळकडून खुलासा


गोकुळ दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली असली, तरी दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही डोंगळे यांनी म्हटले आहे. म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाकडून दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्यात आली आहे म्हशीच्या दूध 5.5 ते 6.4 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर एक रुपयांनी तर 6.5 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या पुढील दुधास प्रतिलिटर दीड रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यात खासगी व इतर दूध संघांचे गायीच्या दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले असून याबाबींचा विचार करुन गाय दूध खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी पत्रकात म्हटले आहे.


गोकुळची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोकुळची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली होती. सत्ताधाऱ्यांनी सभेसाठी बनावट सभासद आणले, प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत, असा आरोप विरोधकांतर्फे करण्यात आला. सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणार असल्याचे सांगूनही विरोधी महाडिक गटाने सभा उधळवून लावण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. घोषणांमध्येच विषय पत्रिकेवरील 1 ते 12 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयासह लेखी आलेल्या 24 प्रश्‍नांना अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी उत्तरे दिली. मात्र, दोन्ही गटांतील गोंधळ शेवटपर्यंत संपला नाही. याच गोंधळात सभा संपवण्यात आली. अध्यक्ष डोंगळे यांनी ताळेबंद वाचण्यास सुरुवात करताच सभागृहात खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक व शौमिका महाडिक यांचे झेंड आणि पोस्टर झळकवत प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही पाटील यांचे फलक झळकवत महाडिक गटासमोर अखंडपणे जोरदार घोषणा सुरू ठेवल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या